चंदनाची चोरी करणारा अटकेत !

Foto

वैजापूर : चंदनाची चोरी करून त्याची बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी चंदनचोरास अटक करून मुद्देमाल जप्‍त केला आहे.अशोक भाऊसाहेब गायकवाड (वय 39 वर्षे, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाडगाव येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी अशोकगायकवाड हा दुचाकी (क्र. एम.एच. 17/जी. 5490)  वरून जात होता. त्यावेळी अशोकने दुचाकीवर पांढर्‍या रंगाच्या बॅगमध्ये चंदनाचे झाड कापून त्याचे वेगवेगळे भाग करून ते पिशवीमध्ये ठेवले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे सांगितले. वैजापूर येथून अहमदनगर जिल्ह्यात चंदनाची विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे अशोकने पोलिसांना सांगितले. सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीशकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पलेपवाड, कासोदे यांनी केली.